Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - मातेची भेट

कालांतराने शंकराचार्यांना त्यांची आ‌ई बराच काळ आजारी असल्याची बातमी कळाली. ते त्यांच्या शिष्यांना बरोबर न घेता एकटेच कालडीला जाण्यास निघाले. त्यांची आ‌ई अगदीच आजारी असून तिला उठता येणे शक्य नव्ह्ते. आचार्यांनी अतीव आदराने आ‌ईच्या पायास स्पर्श करून तिला नमस्कार केला. मग त्यांनी हरीची प्रार्थना केली. हरीचे दूत आले. आचार्यांच्या मातेने देहत्याग केला आणी तिने हरीदूतांसमवेत स्वर्गारोहण केले.


शंकराचार्यांना त्यांच्या आ‌ईचे अंत्यविधी करण्यामधे खुपच अडचणी आल्या. सहसा संन्यासीलोक गृहस्थाश्रमातली कर्तव्ये आचरत नाहीत. सर्व नंबुद्री ब्राह्मण आचार्यांच्या विरोधात होते. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या नातेवा‌ईकांनी देखील काही मदत केली नाही. कोणीही त्यांच्या मातेचे पार्थिव शरीर अंत्यसंस्काराच्या जागेपर्यंत घे‌ऊन जाण्यास तसेच अग्निसंस्कारास मदत केली नाही. अखेर आचार्यांनी सर्वकाही स्वतःच करण्याचे ठरविले. मातेचे शरिर एकट्याला नेता येणार नाही म्हणून त्यांनी त्याचे तुकडे केले आणी ते घराच्या मागील बाजुस नेले. केळीच्या झाडाची खोडे जमा करून त्यांनी चिता तयार केली आणी सर्व तुकडे त्यावर ठेवून योगसामर्थ्याने अग्नि प्रकट केला. शंकराचार्यांना नंबुद्री ब्राह्मणांना धडा शिकवायचा होता म्हणुन त्यांनी तिथल्या गावप्रमुखाला असे फर्मान जारी करण्यास सांगितले की, नंबुद्री ब्राह्मणांनी त्यांच्या घराच्या जवळचा एक कोपरा अंत्यविधीसाठी राखुन ठेवावा, आणी घरातील कोणी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या पार्थिवाचे तुकडे करून त्या राखीव जागेमधे अंत्यसंस्कार करावेत. नंबुद्री ब्राह्मणांमधे आजतागायत ही प्रथा चालू आहे. (हा अनुवाद असल्यामुळे या माहितीची खात्री देता येत नाही.)


या घटनेनंतर आचार्य शृंगेरीला परतले. तेथपासुन त्यांनी अनेक शिष्यांसमवेत भारताच्या पुर्वकिनाऱ्याची यात्रा केली. ते जेथे गेले तेथे त्यांनी अद्वैत तत्वद्न्यानाचा प्रचार केला. त्यांनी पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना केली. कांचीपुरम येथे जाऊन शाक्तपंथीयांशी वादविवाद केला. चौल, पांड्य राज्यांमधे जाऊन वादविवादात जय मिळविला. उज्जैन येथे जाऊन भैरवांच्या दुष्ट कृत्यांना आळा घालून मानवी रक्तपात थांबविला. द्वारकेला मठाची स्थापना केली. यानंतर त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर भ्रमण करून अनेक महत्वाच्या व्यक्तींबरोबर आध्यात्मिक वादविवाद केले.

No comments: