Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - जन्म आणी बालपण

ई.स. ७८८ मधे शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कालडी नावाच्या गावी झाला. कालडी रेल्वेस्थानक हे कोची - शोरानूर मार्गावर अल्वा‌ए (Alwaye) च्या ६ मैल पुर्वेस आहे. त्यांचा जन्म नंबुद्रीपाद (केरळीयन ब्राह्मण) घराण्यात झाला. राजशेखर नावाच्या जमीनदाराने कालडी गावी एक शंकराचे दे‌ऊळ बांधले. आणी त्या देवळाच्या सेवेत असलेल्या ब्राह्मण कुटुंबांसाठी जवळच एक छोटी ब्राह्मणवाडी तयार केली. केरळमधे अशा ब्राह्मणवाडीला अग्रहार (Agrahar) म्हणतात. विद्याधिराज नावाचा एक ब्राह्मण अग्रहारात राहुन देवळात पुजा करीत असे. त्याला शिवागुरु नावाचा एकुलता एक मुलगा होता. शिवागुरुने आवश्यक शास्त्राध्ययन करून योग्य वयात लग्न केले होते. त्याला बराच काळ मुलबाळ नव्हते. तो आणी त्याची बायको आर्याम्बा यांनी शंकराला केलेली प्रार्थना फळास ये‌ऊन त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. उत्तरायणामधे, वसंत ऋतुतल्या एका सुंदर दुपारी, पवित्र अशा अभिजित मुहुर्तावर या मुलाचा जन्म झाला. हाच मुलगा पुढे जगद्‍गुरू शंकराचार्य झाला.



शंकर सात वर्षाचा असताना त्याचे वडिल शिवागुरू यांचे निधन झाले. त्यामुळे त्याचे शिक्षण कसे होणार हा प्रश्नच होता. त्याची आ‌ई एक असाधारण स्‍त्री होती. तिने शंकरला सर्व शास्‍त्रांचे शिक्षण मिळेल यासाठी खुप प्रयत्‍न केले. शंकरचे उपनयन (मौंजीबंधन) वयाच्या सातव्या वर्षी त्याच्या वडिलांच्या निधनानंतर झाले. त्याच्या बुद्धिमत्तेची असामान्य चमक लहानपणापासुनच दिसुन येत होती. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याला सर्व प्रकारचे तत्वद्न्यान तसेच ब्रह्मद्न्यान अवगत हो‌ऊन त्यामधे तो अधिकारी झाला होता. महान आश्चर्य म्हणजे त्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता, उपनिषदे, ब्रह्मसुत्रे यांवर भाष्ये लिहिली. (भाष्य = समालोचन अथवा सारांश)



शंकरच्या आ‌ईने त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याची पत्रिका अनेक भविष्यवेत्त्यांना दाखविली. पण शंकरने मात्र सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेण्याचा पक्का निर्धार केला होता. या निर्णयामुळे आ‌ईला अतिशय दुःख झाले आणी तिला असे वाटू लागले की एकुलत्या एका मुलाने जर संन्यास घेतला तर आपले मरणोत्तर विधी, पिंडदान, ई. कोण करणार ? शंकरने आ‌ईला वचन दिले की मी तुझ्या मृत्युच्या आधी तुला भेटायला नक्की ये‌ईन, तसेच तुझे मरणोत्तर विधी देखील पुर्ण करेन. तरी देखील आ‌ईचे समाधान हो‌ऊ शकले नाही.



एके दिवशी तो आ‌ईबरोबर नदीवर स्नानाकरीता गेला असता, तो पाण्यात खेचला जा‌ऊ लागला, त्याला असे जाणवले की मगरीने त्याचा पाय धरला आहे. तो आ‌ईला जोरात ओरडून म्हणाला, माते, मेलो मेलो, मगर मला पाण्यात घे‌ऊन जात आहे, मला संन्यासी असताना मरण्याची ईच्छा आहे, मला ते सुख मिळू दे, आत्ता लगेच संन्यास घेण्याची मला परवानगी दे, मला अपथ संन्यास घे‌ऊ दे.



आ‌ईने ताबडतोब त्याला परवानगी दिली. आणी शंकरने अपथ संन्यास घेतला. ( अपथ संन्यास = मृत्यु जवळ आला असताना घेतला जाणारा संन्यास). पण त्यानंतर मगरीने त्याला ईजा न करता सोडून दिले. अशा प्रकारे शंकर पाण्यातुन संन्यस्त हो‌ऊन बाहेर आला. त्याने पुन्हा एकदा आ‌ईला दिलेल्या वचनाचा पुनरूच्चार केला. त्याने असलेली मालमत्ता नातेवा‌ईकांना दे‌ऊन त्यांना आ‌ईची काळजी घेण्यास सांगितले. आणी तो खर्‍या अर्थाने संन्यास घेण्यासाठी गुरूच्या शोधार्थ निघाला.

1 comment:

Abhijit said...

mast mahiti dilee aahe. dhanyavaad!