Friday, October 3, 2008

आद्य शंकराचार्य - शृंगेरी मठ

म्हैसुरच्या वायव्येला, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी सुंदर अरण्यांनी वेढलेल्या भागात शृंगेरी गाव आहे. येथेच शंकराचार्यांनी त्यांच्या पहिल्या मठाची स्थापना केली. तुंगभद्रेचीच एक शाखा असलेली तुंगा नदी मंदिराच्या अगदी जवळून वाहते. जसे गंगा स्नान पवित्र मानले जाते, तसेच तुंगेचे स्वच्छ, पारदर्शक पाणी तिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. (गंगा स्नानम्, तुंगा पानम् असे म्हणले जाते) शृंगेरी हे ठिकाण साधुता आणी पावित्र्याने परिपुर्ण आहे. येथले सौंदर्य पहाण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. या मठाला आजवर अनेक भक्त भाविकांनी भेट देऊन या स्थानाच्या महानतेचा आदर केला आहे. याचे कारण स्वामी विद्यारण्यांसारख्या अनेक महान लोकांनी मठाचे प्रमुख पद भुषविले आहे. हे सर्वजण मठाच्या संस्थापकांएवढेच ख्यातकिर्त होते.

विद्यारण्यस्वामींनी संस्कृतमधे लिहिलेल्या सायन नामक ऋग्वेदावरील भाष्याचा अनुवाद करण्यासाठी प्रसिद्ध जर्मन तत्वद्न्य व संस्कृतचे अभ्यासक प्रो.मॅक्समुल्लर यांना तब्बल तीस वर्षे लागली होती. मॅक्समुल्लर यांनी अनुवादाच्या प्रस्तावनेत असे नमुद केले आहे, तीस वर्षातला एकही दिवस असा गेला नाही की निदान दहा मिनिटे का होईना अनुवादाचे काम केले नाही. जेव्हा सायन ग्रंथातील मजकुर त्याच्या जिर्णतेमुळे काही ठिकाणी समजत नव्हता, तेव्हा त्याकाळच्या म्हैसूरच्या महाराजांच्या मदतीने, मॅक्समुल्लर यांनी शृंगेरी मठातील मुळ हस्तलिखित संदर्भासाठी मिळविले होते.

श्रीशारदा मठ हा सर्व प्रकारच्या भक्तांना सारख्याच प्रमाणात आकर्षित करून घेतो. भारतामधे अनेक मठ, आश्रम असे आहेत की ज्यांचे प्रमुखपद कोणी ना कोणी महान, पवित्र व्यक्ती अथवा त्यांची गादी चालविणारे शिष्य भुषवित आहेत, तसेच या मठांमधे भारताच्या सर्व भागातून हिंदू भाविक एकत्र जमतात, पण यापैकी कोणताच मठ आद्य शंकराचार्यांचे मुळ पीठ शृंगेरी मठाएवढा प्रसिद्ध नाही. शृंगेरी पीठ हे जगातील जुन्या मठांपैकी असून, गेली बारा शतके (१२०० वर्षे) त्याची विजय पताका डौलाने फडकते आहे. आचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांपैकी हे पहिले द्न्यानपीठ आहे (आणखी तीन म्हणजे पुरी, द्वारका, ज्योतिर्मठ). ही चारही पीठे हिंदूंना आदरणीय असलेल्या चार वेदांचे जणू प्रतिनिधित्वच करत आहेत.

आचार्यांनी त्यांच्या चार शिष्यांची (सुरेश्वर आचार्य, पद्मपाद, हस्तामलक, त्रोटकाचार्य) अनुक्रमे शृंगेरी, पुरी, द्वारका आणी जोशीमठ या पीठांच्या प्रमुखपदी नेमणूक केली. या गुरूपरंपरेतील सर्वात प्रसिद्ध संन्यासी अर्थातच विद्यारण्यस्वामी आहेत. ते वेदांचे महान भाष्यकार तसेच विजयनगर साम्राज्याचे शिल्पकार होते. आधी ते विजयनगरचे दिवाण होते, त्यांनी साधारण ई.स.१३३१ मधे संन्यास घेतला. विद्यारण्यस्वामींच्या आधी शृंगेरीपीठाचे अकरा गुरू होऊन गेले, ते असे, शंकराचार्य, विश्वरूप, नित्यबोधघन, द्न्यानघन, द्न्यानोत्तम, द्न्यानगिरी, सिंहगिरीश्वर, ईश्वरतिर्थ, नरसिंहतिर्थ, विद्याशंकरतिर्थ आणी भारतीकृष्णतिर्थ.

शृंगेरी मठ हे असे ऐतिहासिक, पवित्र धर्मासन आहे जे व्याख्यान सिंहासन अर्थात द्न्यानाचे आसन म्हणून ओळखले जाते. हे आसन आद्य शंकराचार्यांना त्यांच्या तत्वद्न्यानातील अथांग विद्वत्तेचा गौरव करण्यासाठी प्रत्यक्ष सरस्वतीनेच बहाल केले आहे असे मानले जाते. आजवर या विद्वत्तेच्या आसनाचे प्रमुखपद पस्तिसहून जास्त आचार्यांनी भुषविले असुन गुरू परंपरा अखंड चालू ठेवली आहे.

आद्य शंकराचार्यांनी संन्याशांचे दहा प्रकार (दशनामी) रूढ केले. संन्याशांनी पुढील दहापैकी एक उपनाम (पद) त्यांच्या नावापुढे जोडायचे. सरस्वती, भारती, पुरी (शृंगेरी मठासाठी तीन), तिर्थ, आश्रम (द्वारका मठासाठी दोन), गिरी, पर्वत, सागर (जोशी मठासाठी तीन), वन आणी अरण्य (गोवर्धन मठासाठी दोन). परमहंस ही उच्च पदवी असुन, ती या सर्व श्रेणींच्याही वर आहे. खुप काळ वेदांताचा अभ्यास, ध्यान तसेच आत्मानुभुती याद्वारे परमहंस पदापर्यंत पोहोचता येते. अतीवर्णाश्रमी हे सर्व जातीधर्मांच्या तसेच भौतिक जीवनाच्या पलीकडे असून ते कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या लोकांबरोबर जेवू शकतात. आचार्यांच्या परंपरेतील संन्यासी भारतात सर्वत्र आढळतात.