Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - गुरूच्या शोधात

गुरूच्या शोधात निघालेला बालशंकर हिमालयामधे बद्रिकाश्रम (बद्रिनाथ) येथे स्वामी गोविंदपाद आचार्य यांच्या मठात पोहोचला आणी त्याने मी आपला शिष्य हो‌ऊ ईच्छितो, अनुग्रह करावा अशी आचार्यांच्या चरणी प्रार्थना केली. आचार्यांनी त्याला नावगाव विचारले. तेव्हा तो म्हणाला, गुरूदेव, मी पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचमहाभुतांच्या पलिकडे असुन, अविनाशी आत्मा आहे. हे आत्मतत्व सर्व नावांमधे सर्व रूपांमधे भरून उरले आहे. नश्वर शरिराची ओळख करून देताना तो म्हणाला, मी केरळमधील ब्राह्मण असुन, शिवागुरू यांचा पुत्र आहे. मी लहान असतानाच माझे वडिल ईहलोक सोडून गेले. आ‌ईने माझे लालन पालन केले. स्थानिक शिक्षकांकडून मी वेदशास्त्रांचे अध्ययन केले. नदीमधे स्नानासाठी गेलो असता मगरीने माझा पाय धरला होता, तेव्हा मी अपथ संन्यास घेतला आहे. तरी मला शास्त्रशुद्ध संन्यासाची दिक्षा देण्याची कृपा करावी.



स्वामी गोविंदपाद यांना शंकरचे सत्यकथन ऐकून परम आनंद झाला. त्यांनी त्याला दिक्षा दे‌ऊन संन्यासवेष बहाल केला. गोविंदपादांनी त्याला अद्वैत तत्वद्न्याचे शिक्षण दिले. हे शिक्षण त्यांना त्यांचे गुरू गौडपाद आचार्य यांच्याकडून लाभले होते. शंकरने गुरूकडून तत्वद्न्यानाचे सर्व सिद्धांत आत्मसात करून घेतले. कालांतराने गुरुने त्याला काशीक्षेत्री जाण्याची आद्न्या केली. शंकरला त्याचे गुरू गोविंदपाद आणी परमगुरू गौडपाद यांच्याबद्दल अत्यंत आदर आणी अभिमान होता. शंकरने काशीक्षेत्री जा‌ऊन ब्रह्मसुत्रे, गीता, उपनिषदे यावर भाष्ये लिहिली. त्याचे हे लिखाण त्याच्या समकालीन तसेच पुर्वसुरींनी केलेल्या लिखाणाच्या तोडीचे, किंबहुना काकणभर सरसच होते. त्यानंतर त्याने भारतभ्रमण करून त्याच्या तत्वद्न्यानाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आणी असे करताना छोट्या शंकरचे महान तत्ववेत्ता आदिगुरू, जगद्‍गुरू शंकराचार्यात रूपांतर झाले.

1 comment:

Haribhau Niturkar said...

I feel, shrI shankaracharya met Govind bhagavatpadacharya on the bank of Narmada, (Omkareshvar)