Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - दिग्विजय

शंकराचार्यांचे तत्वद्न्यानातील विजय हे जगात एकमेवाद्वितीय आहेत. त्यांनी काशीक्षेत्री शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संपुर्ण भारतभ्रमण केले त्यामधे ठिकठिकाणी झालेल्या वादविवादात सर्वत्र त्यांना विजय प्राप्‍त झाला. त्या काळात असलेल्या अनेक विद्यापीठे, गुरूकुल, मठ, ई. च्या प्रमुखांना ते भेटले. त्यांच्याशी चर्चा करून आचार्यांनी त्यांना वैदिक धर्माचे सत्यत्व, महत्व पटवून दिले, जे त्यांनी त्यांच्या भाष्ये, टिका, ई. साहित्यात लिहिले आहे. त्या काळात नावाजलेल्या सर्व प्रमुख पीठांकडे ते गेले. त्यातील सुप्रसिद्ध तत्ववेत्त्यांना चर्चेचे आवाहन केले, आणी चर्चे‌अंती त्या सर्वांची मते व दृष्टिकोन बदलविण्यात सफल झाले. आचार्यांनी भट्‍ट भास्कर याला वादात हरवून त्याने लिहिलेल्या वेदांतसूत्रावरील भाष्यामधील चुका दाखवून दिल्या. नंतर त्यांनी दंडी व मौर्य यांना तत्वद्न्यान शिकविले. तदनंतर खंडन खंडन खाद्य या पुस्तकाचा लेखक हर्ष (बहुधा कुमारील भट्‍ट असावा) याला तसेच अभिनवगुप्‍त, मुरारीमिश्र, उदयनाचार्य, धर्मगुप्‍त, कुमारील, प्रभाकर, ई. विद्वानांना वादविवादात हरविले.



शंकराचार्य महिष्मतीला गेले. त्यावेळी तेथील दरबारात प्रमुख पंडित होता मंडनमिश्र. मंडनमिश्राचा कर्मयोगावर दृढ विश्वास असल्याने त्याचा संन्यासमार्गावर अत्यंत राग होता. नेमका मंडन श्राद्धविधी करीत असताना आचार्य तेथे उपस्थित झाले. त्यांना पहाताच मंडनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणी सर्वांदेखत त्यांच्यात कटू संभाषण सुरू झाले. श्राद्धासाठी जमलेल्या ब्राह्मणांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. मग आचार्यांनी मंडनमिश्रास धर्मचर्चेचे आवाहन केले आणी मंडनने ते स्विकारले. या चर्चेला मध्यस्थ (पंच) म्हणून प्रगल्भ विद्वत्ता असलेली मंडनची बायको भारती हिला नेमले गेले. उभयपक्षी असे ठरले की, जर शंकराचार्यांचा वादविवादात पराजय झाला तर त्यांनी विवाह करून गृहस्थाश्रम स्विकारायचा आणी जर मंडनमिश्राचा पराजय झाला तर त्याने संन्यास घे‌ऊन त्याच्या पत्‍नीच्या भारतीच्या हातून संन्यासवेष स्विकारायचा. खर्‍या तळमळीने वादविवाद सुरू झाला आणी अनेक दिवस विनाव्यत्‍यय चालू राहीला. भारती पंच असूनही वादविवादाच्या ठिकाणी थांबून चर्चा ऐकत बसली नाही, तर तिने दोघांनाही चर्चेच्या वेळी गळ्यात हार (पुष्पमाला) धारण करण्यास सांगितले आणी म्हणाली की ज्याचा हार आधी कोमेजण्यास सुरूवात हो‌ईल त्याने आपला पराजय कबूल करावा. मग ती नैमित्तिक गृहकृत्यांकडे लक्ष देण्यासाठी निघून गेली. त्या दोघांचा वादविवाद सतरा दिवस सुरू होता. त्यानंतर प्रथम मंडनमिश्रची पुष्पमाला कोमेजण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्याने पराजय मान्य केला आणी तो संन्यास घे‌ऊन शंकराचार्यांचा शिष्य होण्यास तयार झाला.



भारती ही विद्येची देवी सरस्वतीचा जणू अवतारच होती. एकदा दुर्वास ऋषींनी एका देवसभेमधे ब्रह्मा आणी त्याची पत्‍नी सरस्वती यांच्यापुढे वेदपठण केले. त्यामधे त्यांच्याकडून थोडी चूक झाली. यावर सरस्वती हसली. तेव्हा दुर्वासांनी संतप्‍त हो‌ऊन तिला पृथ्वीवर मानवलोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. त्या शापामुळे सरस्वतीनेच भारतीच्या रूपाने जन्म घेतला असे समजले जात असे.



भारतीने वादविवादात हस्तक्षेप करून शंकराचार्यांना सांगितले की मी मंडनमिश्राची अर्धांगिनी आहे. तुम्ही फक्‍त मंडनचा पराभव केला आहे. आता तुम्हाला माझ्याबरोबर चर्चा करावी लागेल. यावर आचार्यांनी स्त्रियांबरोबरच्या चर्चेस आक्षेप घेतला. भारतीने स्त्रियांबरोबरच्या चर्चेचे ईतिहासातील अनेक दाखले दिले. मग आचार्य चर्चेस तयार झाले, आणी त्या दोघांचा वादविवाद देखील सतरा दिवस विनाव्यत्यय चालू राहिला. भारतीने अनेक शास्त्रांमागून शास्त्रांचा परामर्ष घेत वाद घातला, अखेर तिला लक्षात आले की आपण आचार्यांना सहजपणे हरवू शकत नाही. मग तिने कामशास्त्राचा आधार घे‌ऊन त्यांना हरविण्याचे ठरविले.



शंकराचार्यांनी कामशास्त्राचे द्न्यान नसल्यामुळे त्याच्या अभ्यासाकरीता वादविवाद थांबवून भारतीकडून एक महिन्याची मुदत मागितली. त्यास तिने मान्यता दिली. मग आचार्य महिष्मतीहून वाराणशीस गेले. तेथे त्यांनी योगविद्येने त्यांचा आत्मा शरिरापासून अलग करून, स्वतःचे पार्थिव शरिर एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले, आणी आपल्या शिष्यांना आपण परत ये‌ईपर्यंत पार्थिवाची काळजी घेण्यास सांगितले. अमरूक नामक राजाचा मृत्यु झाला होता आणी त्याला अंत्यसंस्कारासाठी घे‌ऊन जात होते. आचार्यांच्या आत्म्याने त्या राजाच्या शरिरात प्रवेश केला आणी ते उठून बसले. मेलेला राजा अचानक जिवंत झाल्याने प्रजाजन आनंदी झाले.



राजाच्या बोलण्याचालण्यावरून राण्यांना तसेच मंत्रीवर्गाला लक्षात आले की जिवंत झालेला राजा नसून कोणा शुद्ध आचार विचारांच्या द्न्यानी, महान व्यक्‍तीचा आत्‍मा राजाच्या शरिरात वसतीला आला आहे. त्यामुळे त्यांनी गुप्‍तहेरांना आद्न्या केली की जवळपासच्या जंगलात, गुहेत कोणा साधू संन्याशाचे मृतशरिर लपवून ठेवले आहे का याचा शोध घ्या. त्या सर्वांनी विचार केला की असे मृतशरिर सापडले आणी ते नष्ट केले तर हा महान आत्मा आपल्या राजाच्या शरिरात पुढे बराच काळ राहू शकेल.



शंकराचार्य त्या राजाच्या राण्यांसोबत राहून प्रेमाचे अनुभव घे‌ऊ लागले. मायेची ताकद अफाट असते, त्या राण्यांसोबत रहात असताना आचार्य हे विसरून गेले की त्यांनी त्यांच्या शिष्यांना परत येण्याचे वचन दिले होते. काही काळाने शिष्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध घेत असताना त्यांना अमरूक राजाच्या आकस्मिक जिवंत होण्याची बातमी कळाली. तातडीने त्या नगरात जा‌ऊन त्यांनी राजाची भेट घेतली. शिष्यांनी तत्वद्न्यानाशी संबंधित काही गाणी म्हणल्यावर शंकराचार्यांना सर्व काही आठवले. मग सारे शिष्य जेथे आचार्यांचे निष्प्राण शरिर लपवून ठेवले होते त्या ठिकाणी गेले. पण तोपर्यंत राण्यांच्या दूतांना त्या शरिराचा पत्ता लागला होता आणी त्यांनी ते शरिर दहन करायला सुरूवात केली. पण त्याचवेळी आचार्यांच्या आत्म्याने शरिरात प्रवेश केला आणी हरीची प्रार्थना सुरू केली. ईशकृपेने जोराचा पा‌ऊस आला आणी दहनाकरीता पेटविलेली आग विझली.



शंकराचार्य पुन्हा मंडनमिश्राच्या घरी गेले. भारतीबरोबरचा थांबलेला वादविवाद सुरू करून त्यांनी तिच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. मंडनमिश्राने त्याची सर्व मालमत्ता आचार्यांना भेट दिली, परंतू त्यांनी मंडनला ती सर्व मालमत्ता गरीब व गरजू लोकांना वाटण्यास सांगितले. मंडनने आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांनी त्याला संन्यासमार्गाची रीतसर दिक्षा दिली, आणी त्याला नविन नाव दिले ’सुरेश्वर आचार्य’. नंतरच्या काळात हेच सुरेश्वर आचार्य शृंगेरी मठाचे पहिले अधिपती झाले. भारती देखील त्यांच्याबरोबर शृंगेरीला गेली. तेथे तिची आजही पुजा केली जाते.



शंकराचार्यांनी भारताच्या सर्व भागातून वैदिक अभ्यासकांना बोलावून त्यांच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. एक प्रकारे ते सर्वद्न्यतेच्या शिखरावर पोहोचले होते. आचार्यांनी त्यांच्या काळात असलेल्या विरोधी विचारांच्या धर्ममार्तंडांना नेस्तनाबूत करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्या काळात असलेल्या ७० ते ७२ पंथांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. शंकराचार्य जगद्‍गुरू झाले.



शंकराचार्यांनी अन्य धर्मांविरोधातदेखील संपूर्ण यश मिळवले होते, एवढे की त्या नंतर आजतागायत ते धर्म भारतात डोके वर काढू शकले नाहीत. काही धर्म तर हद्दपार झाले. नंतरच्या काळात काही आचार्य उदयास आले, पण शंकराचार्यांप्रमाणे विरोधी विचारांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व कोणीही प्रस्थापित करू शकले नाही.

1 comment:

निनाद said...

आद्य शंकराचार्यांनी आपले शरीर उज्जैन येथे ठेवले होते. हे एक शिव मंदीर आहे आणि आजही तेथे जाता येते. या शिवमंदिराच्या खाली एक तळघर असलेली जागा आहे. या जागेवर शंकराचार्यांनी आपला देह विना प्राण सहा महिने ठेवला होता. त्या काळात त्यांचे शिष्य देहाची काळजी घेत होते. हे मंदिर मध्यप्रदेशात उज्जैन शहराजवळ आहे. शक्य झाल्यास त्याचा फोटो मिळवून येथे देईन.