Thursday, July 2, 2009

आद्य शंकराचार्य - काही प्रसंग

एके दिवशी आचार्य त्यांच्या शिष्यांसमवेत गंगास्नानाकरिता चालले असता त्यांना वाटेत एक चांडाळ कुत्र्यांना घेऊन जाताना दिसला. शिष्यांनी ओरडून त्याला वाटेतुन बाजुला होण्यास सांगितले. चांडाळाने आचार्यांना विचारले, पूज्य गुरुदेव, आपण अद्वैत वेदांताचे महान उपदेशक असुन अजुनही माणसा माणसांमधे भेद करता ? हे तुमच्या अद्वैतवादाच्या शिकवणीशी सुसंगत आहे का ? अद्वैत हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे का ? चांडाळाच्या बुद्धिमान प्रश्नाने आचार्य चमकले. त्यांना मनोमन वाटले की प्रत्यक्ष भगवान शिव आपल्याला धडा शिकविण्यासाठी या रूपात प्रकट झाले असावेत. त्यांनी लगेच मनिषा पंचक नावाचे पाच श्लोकी स्तोत्र रचले, त्यातल्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जी ऒळ (धृवपद) येते त्याचा अर्थ असा आहे...
जो कोणी मला प्रत्येक गोष्टीकडे अद्वैत दृष्टिकोनातुन पहायला शिकवतो, तो माझा खरा गुरु होय. मग तो ब्राह्मण असो की चांडाळ...

तिर्थक्षेत्र काशी येथे एक विद्यार्थी संस्कृत व्याकरणाचे नियम घोकत बसला होता. तो सारखे "डुकृञ करणे", "डुकृञ करणे" असे म्हणत होता. त्या मुलाचे चिकाटीचे प्रयत्न पाहिले आणि आचार्यांनी तत्काळ एक छोटे काव्य रचून ते गाऊन दाखविले. हेच ते प्रसिद्ध स्तोत्र "भज गोविंदम भज गोविंदम मूढमते". यातुन त्यांनी अशा घोकंपट्टीच्या शिक्षणाचा मुक्तीच्या दृष्टीने असलेला फोलपणा दाखवून दिला. या स्तोत्राचे धृवपद असे आहे...

भज गोविंदम, भज गोविंदम
गोविंदम भज मूढमते
संप्राप्ते सन्निहिते काले
नहि नहि रक्षति डुकृञ करणे

अर्थ : अरे मूढ मना, गोविंदाचे नामस्मरण कर, अंतकाळी हे व्याकरणाचे नियम मदतीला येणार नाहीत.

एकदा काही खोडकर विक्रेत्यांनी आचार्यांना मांस आणि मदिरा अर्पण केली. आचार्यांनी उजव्या हाताने स्पर्श केल्यावर मांसाचे सफरचंदात आणि मदिरेचे दुधात रूपांतर झाले.

आणखी एका प्रसंगात कापालिक पंथाच्या लोकांनी येऊन आचार्यांकडे भेट म्हणुन त्यांचेच शिर (डोके) मागितले. आचार्य या मागणीला कबूल झाले व म्हणाले की जेव्हा मी एकटाच ध्यानमग्न असेन तेव्हा तुम्ही खुशाल माझे शिर घेऊन जाऊ शकता. त्याप्रमाणे कापालिक मोठी तलवार घेऊन आचार्यांचे शिर कापण्यासाठी आले, त्याचवेळेस अचानक आचार्यांचा परमशिष्य पद्मपाद तेथे आला आणि त्याने कापालिकांच्याच तलवारीने त्यांचे हात कापले. पद्मपाद हा नरसिंहाचा भक्त होता. असे म्हणतात की प्रत्यक्ष नरसिंहानेच पद्मपादाच्या शरिरात प्रवेश करून आचार्यांचे रक्षण केले.

ईंग्रजी वेबसाईटवरील चरित्रात नसलेला एक प्रसंग देत आहे. सत्यासत्यतेची खात्रीशीर माहिती नसल्याने क्षमस्व.
शंकराचार्यांच्या उदयाच्या आधीपासुन बौद्धधर्माचा प्रसार भारत तसेच पुर्वेकडील अनेक देशांमधे वेगाने झाला होता. जरी बौद्धधर्म हा बळाच्या जोरावर प्रसारित झाला नसला तरी काही ठिकाणी असा प्रचार होता की बौद्ध धर्माच्या व्यक्तीने स्पर्श केल्यास ज्याला स्पर्श झाला ती व्यक्ती पण बौद्ध झाली. हा धर्मप्रसाराचा अत्यंत जलद आणि बुद्धिमान मार्ग होता. हे समजल्यावर शंकराचार्यांनी त्या भागात जाऊन असा प्रचार केला की मी व माझे शिष्य या सर्व भागातुन संचार करीत असताना शंखनाद करत जाणार आहोत. जो कोणी आमचा शंखनाद ऐकेल तो हिंदू (वैदिक) धर्माचा होईल. हा आधीच्या मार्गापेक्षा जलद आणि बुद्धिमान मार्ग होता.