Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - पुर्वपिठीका

ई.स. ७८८ च्या सुमारास भारतवर्षात धर्म आणी तत्वद्न्यानाच्या क्षेत्रात गोंधळाची परिस्थिती पसरली होती. पंथामागुन पंथ उदयास आले होते. चार्वाक, कापालिक, शाक्त, सांख्य, बौद्ध, माध्यमिक, आणी अनेक. साधारण ७० ते ७२ पंथ होते. त्या सर्वांमधे मतभेद असुन, सतत वैचारिक द्वंद्व चालू असे. देशातील शांतता हरपली होती. अंधश्रद्धा आणी कट्टरतावादाला उधाण आले होते. ऋषीमुनी, साधूसंत, योगी महंतांच्या या लाडक्या देवभूमीवर जणू अंधाराचे साम्राज्य पसरले होते. एकेकाळची वैभवसंपन्न आर्यभूमी दुर्दैवी, करूण झाली होती. आणी अशा सुमारास या भुमीवर आगमन झाले तिच्या एका महान सुपुत्राचे, आद्य शंकराचार्यांचे.


आज वैदिक हिंदू धर्माचे जे काही अस्तित्व आहे ते शंकराचार्यांच्या कर्तुत्वानेच आहे. आज वैदिक धर्माला होणाऱ्या विरोधापेक्षा त्या काळात विरोधी शक्तिंची संख्या तसेच बळ जास्त होते. तरीदेखील, शंकराचार्यांनी एकट्याने अल्पावधीत सर्व विरोधी मतांवर विजय मिळवून, वैदिक धर्म व अद्वैत वेदांताला त्याचे मुळ स्वरूप आणी वैभव प्राप्त करून दिले. याकरीता त्यांची शस्त्रे होती द्न्यान आणी अध्यात्म. त्यापुर्वीचे अवतार राम, कृष्ण यांनी धर्माला होणारे अडथळे दूर करण्यासाठी बळाचा वापर केला होता कारण त्या काळात राक्षस, असूर यांचा विरोध हा शारिरीक आक्रमणाच्या स्वरूपाचा होता. पण कलियुगामधे धर्माला असलेला धोका हा बाह्य नसून आंतरिक स्वरूपाचा आहे. शारिरीक नसून वैचारीक धोका आहे. म्हणूनच शंकराचार्यांच्या उदयाच्या आधी लोकांच्या मनामनातून अधर्माची बिजे रूजत होती. अशा प्रकारच्या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी द्न्यान व आत्मशुद्धीसारखी शस्त्रेच आवश्यक होती. या शस्त्रांना धार लावून ती योग्य प्रकारे वापरली जावीत म्हणूनच की काय शंकराचार्यांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला आणी त्यांनी खुप लवकर लहानपणीच संन्यास घेतला. रामकृष्णादिकांचा जन्म क्षत्रिय कुळात झाला कारण त्या काळात त्यांना धर्मरक्षणासाठी खरोखरीची शस्त्रे घे‌ऊन युद्ध करणे भाग होते.


भारतीय तत्वद्न्यानाच्या ईतिहासातील शंकराचार्यांचे वादातीत स्थान आणी महत्ता सर्वांना माहिती आहेच. जर ते जन्माला आले नसते आणी त्यांनी धर्माच्या पुनर्स्थापनेचे कार्य केले नसते तर कदाचित गेल्या अनेक शतकांमधे झालेली आक्रमणे, लढाया, धार्मिक विद्वेष या सर्वांमुळे बाह्य शक्ती जिंकल्या असत्या आणी भारतात वैदिक धर्म अजिबात राहिला नसता. त्यांचे मौलिक विचारधन आजही सच्च्या हिंदुंच्या नसानसातुन वहात आहे आणी हिंदुधर्माच्या अभ्यासकांच्या मनामनातुन वसत आहे.

No comments: